शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट! तर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा
मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
काल रात्री अजित पवार यांच्या मुंबईतील बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला अनेक आमदार उउपस्थित होते. आज अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी अनेक नेते भाजपला साथ देत आहेत. राष्ट्रवादीचे ४० आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षी शिवसेनेत उभी फूट पडून ४० आमदारांनी बंड केले. या बंडानंतर राज्यात शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही मोठी फूट पडल्याचे बोलले जात आहे.