संभाजी भिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देशात राहू नये : रामदास आठवलेंनी फटकारले
माणदेश एक्सप्रेस न्युज : बीड : संभाजी भिडे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देशात राहू नये असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांनी शिवप्रतिष्ठाणचे संभाजी भिडे यांना फटकारले.
दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादनासाठी बीड शहरात आलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपाइं प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे सोबत होते. यावेळी संभाजी भिडेंवर त्यांनी घणाघाती टीका केली.
नुकतेच संभाजी भिडे यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाबाबत आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाबाबत केलेल्या अतिशय वादग्रस्त विधानांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या आठवले यांना प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना आठवले म्हणाले की, “ज्यांना देशाचं संविधानच मान्य नाही, त्यांनी देशात राहू नये.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप चुकीचा आहे. २०१९ मध्ये नरेंद्र मोदींनी संविधानावर माथा टेकून शपथ घेतली. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार ८० कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४० जागा जिंकू, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला.