हल्ल्यातून बचावल्यानंतर चंद्रशेखर आझादांची योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; म्हणाले….
मी वंचितांचा मुलगा आहे, माझा मृत्यू झाला तरी काय फरक पडणार आहे. माझ्यावर हल्ला होऊन २४ तास उलटले असून आरोपी मोकाट फिरत आहेत.
माणदेश एक्सप्रेस न्युज : नवी दिल्ली : देशातील भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्या झाला होता. या हल्ल्यातून बचावल्या नंतर आझाद यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आझाद म्हणाले, आरोपींना सरकारचे संरक्षण मिळाले आहे, त्यामुळे त्यांना अद्याप अटक झालेली नाही. मुख्यमंत्री योगी माझ्या मरण्याची वाट पाहत होते, पण मी इतक्या सहजासहजी मरणार नाही. कारण मला दलित, वंचित आणि शोषितांसाठी लढायचे आहे, असेही आझाद म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, हल्लेखोराने झाडलेली पहिली गोळी माझ्या कानाजवळून गेली. दुसरी गोळी मात्र मला लागली. तिसऱ्या गोळीमुळे माझ्या कारच्या विंडशील्डचा चक्काचूर झाला. चौथी गोळी झाडताच मी गाडीत बसलो. पुढे काही अंतरावर गेल्यावर हल्लेखोरांनी कार थांबवली. मी ठार झालो, असे त्यांना वाटले. यानंतर हल्लेखोरांना आत्मसमर्पण करायचे होते, अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र माझा भाऊ मनीष याने कारमध्ये यू-टर्न घेताच आरोपींनी पुन्हा गोळीबार केला आणि तेथून पळ काढला.
आरोपींनी चंद्रशेखर आझाद यांच्या कारच्या बरोबरीने पाठलाग करत हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार सुरू केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, यामध्ये आरोपी गोळीबार करताना दिसत आहेत. गोळीबाराचा आवाजही ऐकू येत आहे.
चंद्रशेखर आझाद पुढे म्हणाले , “हा माझ्यावर पहिला हल्ला नाही. वंचितांवर शतकानुशतके हल्ले होत आले आहेत. सत्तेचा संरक्षणाशिवाय ही घटना घडलेली नाही. गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री काहीही न बोलल्याने ते गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचे दिसून येते. मी वंचितांचा मुलगा आहे, माझा मृत्यू झाला तरी काय फरक पडणार आहे. माझ्यावर हल्ला होऊन २४ तास उलटले असून आरोपी मोकाट फिरत आहेत. यावरून त्यांना सत्तेचे संरक्षण असल्याचे स्पष्ट होते.
“मला यापूर्वीही धमक्या आल्या आहेत. यासंदर्भात मी गृहमंत्री, मुख्यमंत्री, जिल्हा दंडाधिकारी आणि एसएसपी यांना पत्र लिहूनही मला सुरक्षा देण्यात आली नाही. चंद्रशेखर यांना सुरक्षा द्यावी, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा नसल्याचे माजी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले होते, असा आरोपही चंद्रशेखर आझाद यांनी केला.