आटपाडीमध्ये भाजपचे मोदी @9 अभियान : आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितली केंद्राच्या योजनांची माहिती ; म्हणाले…
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : येथील विश्रामधाम येथे भाजपचे मोदी @9 अभियान अंतगर्त आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkr) यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिलीच, परंतु त्यांनी विरोधकांचा देखील समाचार घेत सडकून टीका केली. त्याच बरोबर कार्यकर्ते व पत्रकार यांच्या सोबत टिफिन भोजन केले.
यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, देशाच्या पंतप्रधानाची सर्वात मोठी योजना म्हणून किसान सन्मान योजनेचा उल्लेख आहे. यामध्ये १ कोटी पाच लाख शेतकरयांना या योजनेचा लाभ झाला. त्याच बरोबर देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करण्यात येते. त्याच बरोबर भारताने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संकटात देखील संधी शोधत लसीकरणासाठी १८०० कोटी रुपयांची आगावू तरतूद केली अन देशामध्ये कोरानावर लस उपलब्ध झाली.
त्याच बरोबर भारत देश आता जगात दुसरा क्रमांकाचा N95 मास्क, PPE कीट व व्हेंटी लेटर निर्यात करताना देश बनला आहे हे पंतप्रधान मोदी यांचे यश आहे. देशाला मोदीजींच्या काळातच जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे अध्यक्षपद मिळाले. तसेच भारत देश पूर्वी शस्त्रे आयात करणारा देश म्हणून गणला जात होता. परंतु आता आपला देश हा जगातील ८१ देशांना शस्त्रे निर्यात करणारा देश झाला आहे.
देशातील पूर्वांचल राज्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्याने चीनने प्रथमच आपल्या विरुद्ध गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. सैन्यदलामध्ये मोठे बदल करत ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू केली. मेडिकल बाबत ८५ टक्के जागा या मेरीट नुसार भरण्यास परवानगी मुळे देशातील गरिबांची मुळे डॉक्टर होवू लागली आहेत.
त्याच बरोबर विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी सोनिया गांधी यांचे जावई रोबर्ट वढेरा यांच्या चौकशीची मागणी केली होती, अखिलेश यादव यांनी मायावती यांच्या पुतळे बसविण्याच्या चौकशीची तर मायावती यांनी अखिलेश यादव यांच्या खाण घोटाळ्याच्या चौकशी मागणी केली होती. त्यामुळेचे ईडी व सीबीआय चौकशी करत आहेत यामध्ये सरकारचा काही संबंध नाही असे ते म्हणाले.
आटपाडी तालुक्याच्या विचार करता राज्यातील पहिली बंदिस्त योजना म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी टेंभू योजनेचा मान्यता दिली. तसेच खानापूर मतदार संघातून पुणे-बेंगलोर हायवे जात असल्याने त्याचा फायदा देखील मतदार संघाला होणार असून नवीन प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्ग’ देखील आटपाडी तालुक्यातून जाणार असल्याचे सांगितले. जर या सर्व योजना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारने का केल्या नाहीत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. आटपाडी तालुक्याच्या दृष्टीने राजेवाडी तलावाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याबरोबरच त्याठिकाणी शासनाच्या वतीने मंगल कार्यालय देखील उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मोदी @9 अभियानाची आटपाडी तालुक्याची जबाबदारी असणारे विलास काळेबाग, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, युवा नेते जयवंत सरगर, भाजपचे तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, युवा नेते अनिल पाटील, बाजार समितीचे संचालक आबासो पुजारी, शरद काळेल, माजी संचालक विष्णू अर्जुन, भाजप युवा मोर्चाचे प्रणव गुरव, अनिल सूर्यवंशी, चंद्रकांत कोळेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.