माणदेश एक्सप्रेस न्युज : जत : विजापूर येथून महाराष्ट्रत विक्रीस बंदी असणारा गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांना मिळाली होती. या माहितीनुसार सायंकाळी जत शहरातील विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक ताब्यात घेण्यासाठी सापळा लावण्यात आला होता.
गुटखा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक ( एम एच ४३ वाय ७०१९ )जत बस स्थानक परिसरात पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो न थांबता तसाच पुढे गेला. यामुळे पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून शेगाव चौकात तो अडवून ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये पोलिसांना गुटख्याने भरलेली ७० हून अधिक पोती मिळून आली. याची बाजारात किंमत ५२ लाख वीस हजार इतके होते. तसेच आठ लाख रुपये किमतीचा ट्रक ही ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी वाहन चालक सुभाष गोगावले (रा. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा गुटखा कुठे जात होता, कुठून खरेदी करण्यात आला, याचीही पोलीस कसून चौकशी करत आहेत.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश गायकवाड, पोलीस संभाजी करांडे, योगेश पाटोळे, एस. ए. वगरे, सचिन हाक्के, गणेश ओलेकर, शरद हिप्परकर, उत्तम काळेल, राजू माळी, संतोष खांडेकर आदींच्या पथकाने केली.