माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : सद्यस्थितीत कोयना व वारणा धरणातील उपलब्ध पाणीसाठा, तापमानातील वाढ विचारात घेता पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 11, 49 मधील तरतुदीनुसार कृष्णा नदी मधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर सुधारित उपसा बंदी आदेश सांगली पाटबंधारे विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. सदर आदेशानुसार दि. 14 जून 2023 ते दि. 19 जून 2023 पर्यंत उपसा बंदी तर दि. 20 जून 2023 ते दि. 22 जून 2023 उपसा कालावधी आहे. पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील.
पर्जन्यमानानुसार व परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येईल. उपसा बंदी कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खाजगी) कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनअधिकृत समजून संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीकरीता रद्दबातल करण्यात येऊन उपसा संच सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेऊन उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर कृष्णा नदीवरील लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सुक्ष्म सिंचनाचा वापर करून फक्त उभ्या पिकांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने नियोजन करून जलसंपदा विभागास सहकार्य करावे.
धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करून बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी, औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी याची दक्षता घेऊन पाणीनाश टाळण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.