मुंबई : भररस्त्यात पत्नीवर पेट्रोल ओतून तिला पेटविण्याचा धक्कादायक प्रकार चुनाभट्टी पोलिसांच्या हद्दीत घडला. महिलेला
मुलगा होत नाही म्हणून पती तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने त्याला कंटाळून ती वेगळी रहात होती. यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पती संजय ठाकूर (३७) याला अटक करण्यात आली आहे.
संजय हा चुनाभट्टी परिसरात राहत असून गणपतीच्या मूर्ती बनविण्याचा त्याचा व्यवसाय आहे. पीडीत महिला सरितासोबत १३ वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. या दाम्पत्याला चार मुली आहेत मात्र मुलगा होत नाही म्हणून संजय तिला मारहाण करण्यासोबत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला.
इतकेच नव्हे तर ती कामावर जायला निघाल्यावर त्याने तिचा पाठलाग करत तिला पूर्व द्रुतगती महामार्गावरील अण्णाभाऊ साठे उड्डाणपूलाजवळ गाठले. त्यानंतर सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर ओतत तिला लायटरने पेटवले आणि पळून गेला.
ही बाब स्थानिकांनी पाहिली आणि आग विझवत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले आणि संजयच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केला प्रकरणी गुन्हा दाखल करत ताब्यात घेण्यात आले.