‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या आकाशने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात तो म्हणतो, ‘मला डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्याबद्दल आई-बाबांनी मला माफ करावे. मला परीक्षेतील अनुत्तीर्ण विषय काढणे शक्य होईना, त्यामुळे मी जगाचा निरोप घेत आहे.
आई दीदीची काळजी घे, तिला नीट सांभाळ, माझ्या मृत्यूची बातमी आई-बाबांना सांगू नका, मामाला सांगा. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका’ असा मजकूर आकाशने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्याची माहिती फौजदार चावडी पोलिसांनी दिली
सोलापूर, येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आकाश संतोष जोगदंड याने आसार मैदानाजवळील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब उघडकीस आली. तीनवेळा परीक्षा देऊनही ‘एमबीबीएस’च्या पहिल्याच वर्गातील विषय निघत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.
त्या तणावातूनच त्याने बाजारातून दोरी विकत आणून मध्यरात्री गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. आतून बंद असलेला दरवाजा पोलिसांनी तोडला आणि आत प्रवेश केला. त्यावेळी आकाशचा मृतदेह खोलीतील पंख्याजवळील हुकाला लटकत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. त्याचे कुटुंबीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल होताच, सर्वांनीच आकाशचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला होता. दरम्यान, फौजदार चावडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.