कोल्हापूर : बैल आणण्यासाठी गेल्यानंतर रस्ता ओलांडताना वाहनाने दिलेल्या धडकेत शेतक-याचा मृत्यू झाला. ह अपघात साडेनऊच्या सुमारास कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर निळे गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर घडला. विष्णू नारायण इंगवले (वय ५०, रा. कोतोली पैकी इंगवलेवाडी, ता. शाहूवाडी) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विष्णू इंगवले यांनी चांदोली येथील एका शेतक-याचा बैल खरेदी केला होता. बैल आणण्यासाठी ते सोमवारी सकाळी चांदोलीकडे निघाले होते. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर निळे येथे एका हॉटेलमध्ये थांबून त्यांनी मित्रांसोबत चहा घेतला. त्यानंतर लघुशंकेला जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी रत्नागिरीच्या दिशेने जाणा-या भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत इंगवले काही अंतर उडून जमिनीवर कोसळले.
परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना खासगी वाहनातून मलकापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शाहूवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.