पुणे : घरची परिस्थिती बेताची असूनही नौदलामध्ये जाऊन देशसेवेचा ध्यास घेतलेल्या बारामतीच्या ओम दत्तात्रय कळसाईत या विद्यार्थ्याने दहावीच्या परिक्षेत 95 टक्क्यांचा टप्पा गाठला. आई रेखा या शिवणकाम करतात तर वडील दत्तात्रय हे एका कंपनीत नोकरीस आहेत. कळसाईत या दांपत्याची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. मुलाला याची जाणीव असल्याने त्याने मन लावून अभ्यासाचा ध्यास घेतला होता.
आठवीमध्ये त्याला त्यांच्या हुशारीमुळे शिष्यवृत्तीही मिळालेली होती. दररोज पहाटे साडेचारला उठून स्वताःचा नाश्ता स्वताः करुन अभ्यासाला बसायची ओमला सवय होती. पाचवीपासून ओम हा बारामतीतील रयत शिक्षण संस्थेच्या आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूलमध्ये शिकत होता.
त्याला सर्वच विषयात उत्तम गुण मिळाले असून त्याची टक्केवारी 95 पर्यंत गेली. आई वडीलांचे दोघांचेही त्याला कायमच प्रोत्साहन होते, त्या मुळे त्यानेही परिश्रम करुन गुण प्राप्त केले.