मंचरमधील ‘ते’ प्रकरण लव्ह जिहादच : आम. गोपीचंद पडळकर : माहिती देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप
माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर शहरातील धनगर कुटुंबातील अल्पवयीन मुलीला चार वर्षांपूर्वी मुस्लीम मुलाने फूस लावून पळवून नेले. या चार वर्षात मुलीला गैरप्रकार करण्यास भाग पाडले. तिचा छळ करण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण लव्ह जिहादचेच असल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.मंचर (ता. आंबेगाव, पुणे) येथे प्रसारमाध्यमांशी पडळकर बोलत होते. यावेळी संबंधित मुलगी आणि तिचे नातेवाईकही उपस्थित होते. यावेळी पडळकर यांनी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “दहावीची परीक्षा संपली त्याच दिवशी मंचर येथील पीडित मुलीला मुस्लीम मुलाने फूस लावून पळवून नेले. हा मुलगा पीडित मुलीच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सर्व माहिती देऊनही त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. तसेच या प्रकरणी अज्ञानाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वारंवार मदत मागूनही पोलिसांनी हालचाल केली नाही. दरम्यान, आरोपीने मुलीला उत्तरप्रदेशला नेले होते.

आरोपी मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांनी या चार वर्षांत पीडित मुलीला बुरखा घालण्यास भाग पाडले. बीफ खाऊ घातले. तिला नमाज करण्यास सांगितले. तिला गैरप्रकार करण्यास भाग पाडले. तिच्या अंगावर सिगारेटचे चटके दिले आहेत. तिला वारंवार झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. या काळात तिला कुटुंबियांशी संपर्क करून दिला नाही. गेल्या सहा महिन्यापूर्वी आरोपी हा मंचर येथे आला आहे. तेथे तिला कोंडून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी. तसेच आरोपीच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधत, “मतांचे राजकार करण्यासाठी अनेक नेते राज्यात लव्ह जिहाद नाही, अशा चर्चांना हवा देतात. मला लव्ह जिहाद माहिती नाही, असे म्हणाऱ्यांनी या कुटुंबीयांना, पीडित मुलीशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात असे ते म्हणाले.