आटपाडीच्या मेन व्यापारी पेठेतील अनेक व्यवसाय डबघाईला : मुख्य पेठेतील अरुंद रस्ते, वाहतूक पार्किंगचा प्रश्न गंभीर
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/बिपीन देशपांडे : मुख्य पेठेतील अरुंद रस्ते, वाहतूक पार्किंगचा प्रश्न, भाडेतत्त्वावर गावच्या बाहेर उभे झालेले मॉल व त्यावर होणारे देण्यात येणारे डिस्काउंट, ऑनलाइन खरेदी, गुंतवणूक नावाखाली झालेली फसवणूक या साऱ्या परिणामामुळे आटपाडी मेन व्यापारी पेठेतील व्यवसाय ठप्प झाला आहे.
आटपाडी शहराची लोकसंख्या व विस्तार वाढल्याने ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. पिण्याचे पाणी वेळेवर येत असले तरी इतर सुविधांचा अभाव आहे. तालुक्याच्या आसपास गल्लीबोळात रस्ते चकाचक झाले. मात्र पेठेतील रस्त्याची अवस्था बिकट असून, पर्यायी बायपास रस्त्याचा वापर होत असल्याने वर्दळ वाढली आहे.

मुख्य पेठेतील हॉटेल व्यवसाय, कापड दुकान, कृषी दुकान व इतर विविध व्यवसाय कमी प्रमाणात होत चालत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी कोणताही उद्योग प्रकल्प नसल्याने हाताला काम, रोजगार नाही. या साऱ्या परिणामामुळे बाजारपेठेमध्ये चलन फिरणे बंद झाले आहे. बेरोजगारी वाढल्याने, तरुण वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबईला धावत आहे.
राजकीय मंडळींनी प्रयत्न करून तालुक्याच्या ठिकाणी मोठे उद्योग प्रकल्प उभे केले पाहिजेत. त्यामुळे तरुण वर्गांना रोजगार व विकासाला चालना मिळेल आणि यातून पुन्हा पेठेत चलन फिरेल व पेठेला उर्जेवस्था मिळेल.