माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली, हातकनगलेसह सहा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणार आहे. शेतकरी एकटे पाडणार नसतील तर सांगली लोकसभेसाठी महेश खराडे हेच आमचे उमेदवार असतील अशी ग्वाही माजी खा. राजू शेट्टी यांनी दिली.
चार जून रोजी कोल्हापूर येथे ‘नागरट’ साहित्य संमेलन होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले, भागवत जाधव आदी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुका आणि सांगली लोकसभे बाबत संघटनेची काय व्यूह रचना आहे असे पत्रकारांनी विचारल्यावर शेट्टी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुका संघटना स्वबळावर लढणार असून कुणाशीही आम्ही आघाडी करणार नाही. कारण दोन्ही आघाडीचा आम्ही अनुभव घेतला आहे. त्यामुळे एक ला चलो रे हीच आमची भूमिका असणार आहे. स्वबळावर हातकणगले, सांगली, बुलढाणा, कोल्हापूर, माढा आणि परभणी या सहा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणार आहोत.

सांगली लोकसभेसाठी गत वेळी बाहेरील उमेदवारी दिली होती. निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणार का असे पत्रकारांनी विचारता शेट्टी म्हणाले, आता आम्ही बाहेरील परक्या, उपऱ्यांना संधी देणार नाही मग महेश खराडे हे तुमचे उमेदवार असतील काय असे विचारता ते म्हणाले महेश खराडे यांचे काम चांगले आहे त्याचे नाव आघाडीवर आहे मात्र ज्या शेतकऱ्यासाठी तो संघर्ष करतो आहे त्या शेतकऱ्यांनी त्याला एकाकी पाडू नये त्याला एकटे पाडू नये तशी हमी मला शेतकऱ्यांनी द्यावी. अन्यथा, चांगल्या कार्यकर्त्याचा बळी जातो तसे होवू नये. शेतकरी तरुण आणि सर्व सामान्यांनी त्याला साथ द्यावी आगामी लोकसभेसाठी त्याचीच उमेदवारी असेल गेली दहा वर्षे तो सातत्याने ऊस, दूध, द्राक्ष बेदाणा वीज कर्ज माफी ,दुष्काळी भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न तसेच कडकनाथ घोटाळा आदी प्रश्नावर संघर्ष करतो आहे.
तासगाव, नागेवाडी ६० कोटीची ऊस बिले त्याने संघर्ष करून मिळवून दिली. माणगंगा, डोंगराई आदी कारखान्याची ऊस बिले मिळवून दिली आहेत. या सर्व आंदोलनात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अनेक वेळा तो शेतकऱ्यासाठी तुरुंगात गेला आहे. मग जो शेतकऱ्यासाठी संसाराचा होम करून काम करतो आहे त्याला साथ देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे. कडकनाथ घोटाळा आंदोलनाचा छडा लागावा यासाठी त्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोबड्या फेकल्या होत्या त्यावेळी त्याच्या जीवावर बेतले असते. जिवाचीही पर्वा न करता तो संघर्ष करतो असे राजू शेट्टी म्हणाले, यावेळी संजय खोलखुंबे, प्रभाकर पाटील, शमसुद्दीन संदे, बाबा सांद्रे, जगन्नाथ भोसले, दामाजी दुबळ, मानसिंग खोचे, प्रताप पाटील, भैरवनाथ कदम आदी उपस्थित होते.