माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग २०२२ (यूपीएससी) परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२३) जाहीर झाला. या परीक्षेत ठाण्यातील श्रीनगर परिसरात राहणाऱ्या कश्मिरा किशोर संखे हिने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. तर देशात २५ वा क्रमांक मिळवला आहे. ती डेंटिस्ट असून आपला डॉक्टरी व्यवसाय सांभाळत तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाने ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे.
कश्मिरा संखे हिने यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच उराशी बाळगले होते. तिने शालेय शिक्षण आणि पदवी शिक्षण मुंबईतून घेत डेंटल सर्जरीमध्ये पदवी घेतली. डॉक्टरी पेशा सांभाळत रुग्णसेवा करत यूपीएससीचा अभ्यास सुरु ठेवला होता. या परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवले असून राज्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. कश्मिराने तिसऱ्या प्रयत्नात हे यश प्राप्त केले आहे. तिचे पहिले प्राधान्य ‘आयएएस’ तर दुसरे प्राधान्य ‘आयएफएस’साठी होत. वंजारी समाजातील ती पहिली महिला आयएएस ठरली आहे.
