माणदेश एक्सप्रेस : आटपाडी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन क्रीडा क्षेत्रामध्ये दैदीप्यमान यश संपादित करताना संस्कृती आणि संस्कार जोपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मत, आंतरराष्ट्रीय मल्ल, राष्ट्रीय प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पैलवान नामदेव बडरे यांनी व्यक्त केले. दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विजय लोंढे होते.यावेळी प्रा. सुर्यकांत शिंदे शा.शि.संचालक विटा, डाॅ.दशरथ देशिंगे शा.शि.संचालक खानापूर,प्रा.अमोल वसेकर दिघंची , प्रा.शशिकांत वाघमोडे झरे, धनाजी जगताप मंचावर उपस्थित होते. महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.गौरव चव्हाण व प्रा.हणमंत माने यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा.गौरव चव्हाण यांनी केले.

प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील ज्युनिअर व सिनिअर विभागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ मध्ये क्रीडा क्षेत्रातील तालुका,जिल्हा,विभाग,राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव चिन्ह, मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तायक्वांदो क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू हर्षवर्धन सागर,गौरव भाट,शिवानी शिंदे आणि अंजली जावीर,स्वराली अवताडे,कुणाल खरात,श्रावणी देशमुख,संकेत मरभळ,स्नेहल चव्हाण तसेच कुस्तीमधील विक्रमसिंह भोसले,वैभव देशमुख,गोविंदराज पोमधारणे,रोहित लांडगे ,प्रवीण शिंदे,हर्षवर्धन शिंदे,मैदानी स्पर्धांमधील स्वप्नाली खिलारी,रोहिणी बिराजदार,सारंग लांडगे आदी खेळाडूंचा विशेष गौरव करण्यात आला
.याबरोबरच वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये बास्केटबाॅल,कबड्डी,तायक्वांदो,क्रिकेट, कुस्ती,बुध्दीबळ,मैदानीस्पर्धा,व्हाॅलीबाॅल,बॅडमिंटन,टेबलटेनिस इ.स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.यातील यशस्वी खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात आला. नुकतेच मुंबई पोलीस या पदावर नियुक्त झालेल्या महाविद्यालयातील आकाश पिसे,प्रकाश पिसे,सचिन माळी,वर्षा साळुंखे,काजल जाधव,सखुबाई बाड या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पै.नामदेव बडरे बोलताना पुढे म्हणाले की,मुलांनी आपल्या आई वडिलांबद्दल प्रामाणिक निष्ठा,प्रेम बाळगणे महत्वाचे आहे.त्यांना अपमानीत करु नका,मानसन्मान ठेवा,जिद्द,चिकाटी महत्वाची आहे.कुस्तीमधील अनेक यशस्वी खेळाडूंचा उल्लेख करत आपल्या बोलीभाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा.सुदर्शन शिंदे,विटा यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांविषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनामध्ये खेळाडूंची जडणघडण होत असते. खेळावर सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित केल्याने यश प्राप्त होते.डाॅ.विजय लोंढे अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले की, खेळाडूंनी सकारात्मक विचार,सातत्य, नम्रता,विनयशीलता हे गुण अंगी बाळगणे महत्वाचे आहे.
आपली नाळ मातीशी जोडलेली असून खेळामुळे आपले मन,मेंदू,मनगट प्रभावी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजय शिंदे यांनी केले.आभार प्रा.हणमंत माने यांनी मानले.यावेळी प्रा.विलास सुर्वे, डाॅ.संदीप विभुते,प्रा.नेताजी धायगुडे,डाॅ.सुजाता देशमुख,गणेश लिंगे,राजाराम पवार,कृष्णा खिलारी,बाळासाहेब बनसोडे व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.