सांगलीत सोमवारी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासंबंधी बैठक : महेश खराडे : संघटना प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती यांच्यात संयुक्त बैठक
माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : द्राक्ष आणि बेदाण्याच्या प्रश्नावर नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाजार समितीच्या पातळीवरील प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सोमवार दिनांक 22 मे रोजी दुपारी चार वाजता संघटना प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी व बाजार समिती यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
दरम्यान द्राक्ष बेदाणा प्रश्नी असलेले राज्यस्तरीय प्रश्न सोडवण्यासाठी पाच जून पासून सांगलीतील पालक मंत्र्याच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. खराडे म्हणाले द्राक्ष व बेदाणा उत्पादक अत्यंत अडचणीत आहे. त्यात व्यापारी उत्पादकांना लुटत आहे.त ही लूट थांबविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

व्यापाऱ्यांनी योग्य सौदे करून योग्य दर द्यावा, पेमेंट 21 दिवसात द्यावे, त्यानंतर दिल्यास 2 टक्के व्याज द्यावे, बेदाणा बॉक्स चे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत. सौद्यावेळी खाली पाडलेल्या बेदान्याचा एकत्रित सौदा करून ती रक्कम शेतकऱ्यांना वाटप करावी. तूट केवळ 250 ग्रॅम च धरावी, बेदाणा तारण कर्ज पुरवठा सुरू करावा.
द्राक्ष दलालाची नोंदणी बाजार समितीने करून त्याच्या कडून अनामत रक्कम घावी आदी मागण्या अगदी व्यवहार्य आहेत त्या मान्य झाल्याचं पाहिजेत यासाठी आमचा आग्रह आहे.याशिवाय राज्य सरकारशी संबधित काही मागण्या आहेत. राज्य सरकारने अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रती क्विंटल 300 रुपये अनुदान दिले त्याच धर्तीवर द्राक्ष बागायतदारांना एकरी एक लाख द्यावे, बेदाणा उत्पादकला प्रती टन एक लाख अनुदान द्यावे, बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त फटका द्राक्ष शेतीला बसत आहे.
दर, लूट, आणि गंडा ही सुलतानी संकटे द्राक्ष शेती समोर आहेत तर बदलत्या हवामानाचे अस्मानी संकट आहे या दोन्ही संकटातून द्राक्ष शेती वाचविण्यासाठी द्राक्ष शेती 100 टक्के विमा सुरक्षित करावी.
सध्याची पीक विमा योजना बंद करून नवी पीक विमा योजना सुरू करा, द्राक्ष बेदाण्याचा खप सध्या कमी झाला आहे तो वाढविण्यासाठी द्राक्ष आणि बेदाणा खाणे आरोग्याला हितकारक आहे ही सांगणारी जाहिरात टीव्ही वर सुरू करावी, सध्या जाहिरातीचा जमाना आहे, त्यामुळे जाहिरात आवश्यक आहे.
बागेवरील प्लास्टिक कव्हर साठी अनुदान सुरू करावे, प्रिकुलिंग युनिट ची उभारणी करावी ,कीटक नाशक व स्टोरेज भाड्यावरील जीएसटी कमी करावा, औषधाच्या किमती कमी कराव्यात आदी मागण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन पाच जून पासून होणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खराडे यांनी केले.