माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : रिचआधार मल्टी ट्रेडर्स अन्ड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून सांगली, सोलापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना ८३ लाख ४८ हजार पाचशे रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांना न्यायालयाने शनिवारी दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी त्यांना अटक केली होती.
कंपनीचा संचालक सतीश बंडगर, जयश्री बंडगर, संतोष बंडगर व अनिल आलदर (सर्व रा. सांगली) हे चौघे सध्या अटकेत आहेत. त्यांनी रिचआधार मल्टी ट्रेडर्स अन्ड डेव्हलपर्स एल. एल. पी. ही कंपनी स्थापन केली. गुंतवणूक रकमेला कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे त्यांनी आमिष दाखविले. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सहा गुंतवणूकदारांनी ८३ लाख ४८ हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक केली. मात्र कंपनीने त्यांना कोणताही परतावा दिला नाही. गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. तथापि ते टाळाटाळ करू लागल्याने त्यांनी पोबारा केला होता.
