कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या शपथविधी सोहळ्याला ‘या’ आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चा
माणदेश एक्सप्रेस न्युज : बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार यांनी शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा काही वेळापूर्वीच पार पडला. या शपथविधी सोहळ्याला १९ विरोधी पक्षांना बोलवण्यात आलं होतं. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचीही या सोहळ्याला अनुपस्थिती होती.
सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी ममता बॅनर्जींनाही निमंत्रण दिलं गेलं होतं. मात्र ममता बॅनर्जी या शपथविधी सोहळ्याला आल्या नाहीत. तसंच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र उद्धव ठाकरेही या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित होते. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला अनुपस्थित का राहिले? हे अद्याप समजू शकलेलं नाही.

कर्नाटकमध्ये आज नव्या सरकारची स्थापना झाली आहे. काँग्रेसचे कर्नाटकमधील वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपसमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर आता पक्षाने राज्यात सरकार स्थापन केलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांनी या शपथविधीला हजेरी लावली होती.