‘रिचआधार’ कंपनीच्या चौघांना आर्थिक फसवणूक प्रकरणी अटक : आर्थिक गुन्हे अन्वेषणची कारवाई : गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक
माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : रिचआधार मल्टी ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्यास विशिष्ठ कालावधीनंतर रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सांगलीसह सोलापूर येथील सहा गुंतवणूकदारांची ८३ लाख ४८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱया चौघांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.
रिचआधार कंपनीचा संचालक सतीश काका बंडगर, जयश्री सतीश बंडगर, संतोष काका बंडगर आणि अनिल मारुती आलदर (रा. सांगली ) अशी संशयितांची नावे आहेत.

घटनेची माहिती अशी, चौघा संशयितांनी शहरात रिचआधार मल्टी ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल. एल. पी. संतोष बंडडर जयश्री बंडगर नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्याला बळी पडून तक्रारदार याने २६ हजाराची कंपनीत गुंतवणूक केली. परंतु दिलेल्या मुदतीत कोणताच परतावा न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत सतीश बंडगर अनिल आलदर वारंवार पाठपुरावा करुनही कंपनीतील चौघा संशयितांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदाराने सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, त्याप्रमाणेच कंपनीत गुंतवणूक केलेल्या संतोष नांमदेव सुरवसे (रा.जवळा ता. सांगोला, जि. सोलापूर) यांची २३ लाख ५० हजार, प्रविण दिपक कचरे (रा. श्रीपूर ता. माळशिरस जि. सोलापूर) यांची १९ लाख २६ हजार, संगीता चंद्रकांत नलवडे (रा. आमणापूर ता. पलूस ) यांची १९ लाख १० हजार, सागर गिरी गोसावी (रा. अकलूज (ता. माळशिरस जि. सोलापूर) यांची ३ लाख ५ हजार, अनिल एकनाथ सुर्यवंशी (रा. लंगरपेठ ता. कवठेमहांकाळ) यांची ८ लाख ५७ हजार ५०० रुपये अशी एकूण सहा ठेवीदारांची ८३ लाख ४८ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. आर्थिक फसवणुकीची व्याप्ती अधिक असल्याने सदर गुन्हा पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या निर्देशाने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.