माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरो चारचाकी आणि विटाने भरतेला ट्रॅक्टर यांचा भीषण अपघात होऊन ५ जण ठार झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एक महिला, बालकाचा समावेश आहे. यात सोहम पवार ( वय १२), जयवंत पोवार (वय ४५) , कोमल शिंदे (वय ६०), लखन शिंदे (वय ६०) (सर्व रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. (वर्षीय चालकाचे नाव अद्याप कळालेले नाही.)
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी- नागपूर या रस्त्याचा बायपास रस्ता दोन दिवसांपूर्वी सुरु झाला असून सदर या बायपास रस्त्यावर राजीव गांधी नगर या ठिकाणी विटांनी भरलेली ट्रॉली विरोधी दिशेने आल्याने बोलेरो (MH o9 DA 4912) गाडीने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरो गाडीतील तीन पुरुष एक महिला व एका बारा वर्षाच्या मुलाच्या जागीच मृत्यू झाला आहे. मयत पाच जण हे सरवडे येथील (ता. राधानगरी) आहेत. तर या अपघातात तीन जण जखमी झाले असून एका जखमी महिलेची स्थिती गंभीर आहे.

याबाबतची नातेवाईकांना माहिती मिळताच ते तात्काळ मिरजेला रवाना झाले आहेत. जखमी तिघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक अजित टीके, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देशमुख, महात्मा गांधी चौकीचे भालेराव यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. सरवडे येथील सर्व व्यवहार बंद करण्यात आले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.