मुंबई : सोसायटीत फ्लॅट मिळवून देतो, असे सांगत तक्रारदाराकडून दीड कोटी घेऊन त्याची फसवणूक करण्याचा प्रकार दहिसर परिसरात घडला होता. या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी केटी ग्रुप उज्ज्वलाच्या संदीप शेठ (४९) या भागीदाराला अटक केली.
आरोपी शेठ याने फिर्यादी नरेंद्र शहा यांना दहिसर उज्ज्वल को.ऑ.हौसिंग सोसायटी या बिल्डिंगमध्ये फ्लॅट विकत देतो, असे सांगून त्यांच्याकडून चेकने एक कोटी पन्नास लाख रुपये घेतले होते. मात्र, तो फ्लॅट त्यांनी दुसऱ्यालाच विकला. त्यामुळे त्यांनी एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात धाव घेत, शेठ याच्यासह धर्मेश तन्ना आणि अमित पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने शेठला समजपत्र देऊन त्याने हजर राहून तपासाला सहकार्य करणे आवश्यक होते. मात्र, त्याने तपासकामी आवश्यक असलेली कागदपत्रेही सादर केलेले नाहीत आणि वेळेवर हजर राहिला नाही. त्यामुळे आरोपी शेठचा गुन्ह्यातील सहभाग उघडकीस आला आणि त्याला अटक करण्यात आली.