पुणे: मुलीचे लग्न माझ्याशी लावून न दिल्यास तिचे दुसरीकडे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी एकाने दिल्याने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणाच्या विरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
परमेश्वर रमेश पात्रे (वय ४०, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी मुकेश गोपाळ देढे (वय २१, रा. चंदननगर चौकीसमोर, खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर पात्रे यांच्या पत्नीने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी देढे आणि पात्रे यांच्या मुलीची ओळख होती.

त्याने देढे यांच्या मुलीशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो काही कामधंदे करत नसल्याने वडिलांनी तिचा विवाह दुसरीकडे जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
देढे हा मुलीचे वडील परमेश्वर यांना धमकावत होता. मुलीचे लग्न माझ्याशी लावून न दिल्यास तिचे दुसरीकडे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी देढेने दिली होती.
देढेच्या धमकीमुळे परमेश्वर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अंत्यविधी उरकल्यानंतर परमेश्वर यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.