माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर भागामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुरंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अशोक टेकवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदरमधील महत्त्वाचे नेते आहेत. तसेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदरमधील माजी आमदारही आहेत. भाजप प्रवेशाचे कारण देताना मा. आम. अशोक टेकवडे म्हणाले, “मी निर्णय घेतलाय की भाजपामध्ये प्रवेश करायचा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला.

शिवाय माझी त्यांच्याबरोबर समोरासमोर बैठकही झाली. माझ्या लक्षात आलं की पुरंदरच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला काम करण्याची संधी आहे. देवेंद्र फडणवीसांनी ३०-३५ मिनिटांच्या आमच्या चर्चेत मला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला योग्य वाटल्या. म्हणून मी हा निर्णय घेतला”, असं अशोक टेकवडे म्हणाले.