राजस्थानातील कोटा येथे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सदर विद्यार्थी बिहार राज्यातील पटना येथील असून तो कोटा येथे मागील एका वर्षापासून नीट (NEET) परिक्षेची तयारी करत होता. त्याने राहत्या रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
अधिक माहितीनुसार, नवलेश असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव असून त्याने लँडमार्क सिटी येथे असलेल्या कृष्णा विहार मधील आपल्या रूममधील फॅनला गळफास लावला. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवत उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आहे.

सदर चिठ्ठीमध्ये सततच्या अभ्यासामुळे येत असलेल्या तणावामुळे आणि रेग्युलर टेस्टमध्ये मार्क कमी पडत असल्यामुळे आत्महत्या केल्याचं लिहिलं आहे. त्याचबरोबर कोचिंग सेंटरच्या कमी मार्क पडत असल्याने दबावामुळे ही आत्महत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.