Latest Marathi News

BREAKING NEWS

 

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास सांगलीतून बाबर, पडळकर मंत्री होवू शकतात

0 2,426

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमडळ विस्ताराचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातून मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. सध्या राज्याच्या मंत्रीमंडळात मिरज मतदार संघाचे आमदार डॉ. सुरेश खाडे यांचा समावेश असून शिंदे गटाचे खानपूर मतदार संघाचे आमदार अनिल बाबर, भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची नावे चर्चेत आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसांत होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन भाजपकडून स्टार प्रचारक असलेले आम. गोपीचंद पडळकर तर सांगली महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र वापरले तर आम. सुधीर गाडगीळ यांचे नवा सुद्धा चर्चेत आहे.

जिल्ह्यामध्ये सांगलीतून भाजपकडून सुधीर गाडगीळ, मिरज डॉ. सुरेश खाडे हे आमदार आहेत. काँग्रेस कडून पलूस-कडेगाव डॉ. विश्वजित कदम, जत विक्रम सावंत हे आमदार आहेत. राष्ट्रवादी कडून इस्लामपूर मधून जयंत पाटील, शिराळा मानसिंग नाईक हे आमदार आहेत. तर खानापूर मतदार संघातून शिंदे गटाचे अनिल बाबर हे एकमेव आमदार आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, शिक्षण संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच वर्चस्व आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढवायचा असेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टक्कर देणारा नेता अशी दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्याला मंत्री पद मिळेल अशी चर्चा आहे.

तसे झाले तर भाजपकडून विधानपरिषदेचे आम. गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात आहे. मात्र भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केल्यास सांगली मतदारसंघाचे आमदार आणि फडणवीस यांचे समर्थक सुधीर गाडगीळ यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे. तर खानापूर मतदार संघातून शिंदे गटाचे आम. अनिल बाबर हे सलग दुसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांना ही मंत्रिपद मिळेल कारण जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अशी ओळख आम. अनिल बाबर यांची आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गोपीचंद पडळकर व अनिल बाबर यांची मंत्रिपदे ही निश्चित मानली जात आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.