Latest Marathi News

BREAKING NEWS

इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर : तातडीने सुटका करा : पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाचे आदेश

0 219

माणदेश एक्सप्रेस न्युज : नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांना गुरुवारी पाकिस्तान रेंजर्संनी अटक केली होती. इम्रान खान सुनावणीसाठी इस्लामाबाद न्यायालयात हजर झाले होते. याचवेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. पण पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. शिवाय इम्रान खान यांची तातडीने सुटका करण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

गुरुवारी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल, न्यायमूर्ती मुहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अतहर मिनल्लाह या तीन सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली. यानंतर न्यायाधीशांनी इम्रान खान यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.

Manganga

 

७० वर्षीय इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयात हजर केले असता त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून पाकिस्तानी रेंजर्संनी आपलं अपहरण केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्याला काठीने मारहाण केली. एखाद्या गुन्हेगारालाही अशी वागणूक दिली जात नाही. माझ्याबरोबर काय घडतंय? हेही मला अजून माहीत नाही, असं इम्रान खान यांनी सुप्रीम कोर्टात सांगितंल. इम्रान खान यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असून त्यांची तत्काळ सुटका करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. तसेच न्यायालयाने इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने सुटकेचे आदेश दिले असले तरी इम्रान खान यांना अद्याप मुक्त करण्यात आलं नाही. सुरक्षेचं कारण सांगून घरी जाण्याची परवानगी नाकारली आहे. त्यांना इस्लामाबादच्या पोलीस लाईन गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!