माणदेश एक्सप्रेस न्यूज : विटा : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अपेक्षित होता असे प्रतिपादन आम. अनिल बाबर यांनी केले. त्याच बरोबर या निकालाने शिंदे-फडणवीस सरकार स्थिर आणि भक्कम असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले. राज्यात सत्ताबदल झाला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवहाटीला जाणार्यामध्ये आ.अनिल बाबर यांचा समावेश होता.तसेच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आणि तत्कालिन विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्र ठरविलेल्या १६ आमदारांमध्ये आ.बाबर यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना आम. अनिल बाबर म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम असून जनहिताचा विचार करीत प्रगतीच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू असून याचा जनतेला फायदा होतांना दिसत आहे. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे का याबाबत विचारले असता याबाबत अद्याप माझ्याशी कोणी संपर्क साधलेला नाही, अथवा यावर चर्चाही झालेली नाही. मात्र, मंत्रीमंडळ विस्तारात आपणास संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आपला प्रयत्न राहील असेही आ. अनिल बाबर यांनी यावेळी सांगितले.
