सांगली : उन्हाळ्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना मोठ्या दूध संघांनी गाईच्या दूध खरेदी दरात एक रुपयाची कपात केल्याने उत्पादक धास्तावला आहे. पावडरीचे दरही कमी झाल्याने पुढील काही महिन्यांत या व्यवसायात मंदीची शक्यता व्यक्त होत आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी उन्हाळा उत्तम काळ समजला जातो. या काळात उत्पादक व दूध संघांना चांगला नफा मिळत असतो. उन्हाळ्यात दर वाढतात. मात्र यावर्षी प्रथमच ऐन उन्हाळ्यात गाईच्या दूध खरेदी दरात संघांनी एक रुपयाची कपात केली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरीचे भाव किलोमागे २० ते ते ३० रुपये कमी झाल्यामुळे दूध दरात कपात केल्याचे दूध संघांकडून सांगितले जात आहे. महागाईच्या तडाख्यात हतबल झालेला शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहत असतो.
दुधाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून गाई व म्हैशींची खरेदी केली आहे. तथापि दूध उत्पादनासाठी लागणारा चारा, पशुखाद्य, मजूर, पशुवैद्यकीय डॉक्टर यांचा खर्च अमाप वाढला आहे. त्यामुळे दूध दर कमी झाल्याचा फटका उत्पादकांना बसणार आहे.