मुंबई : मुस्लीम युवकांकडून हिंदू मुलींना फसवून सिरीया, अफगाणिस्तान अशा देशांमध्ये नेल्याच्या आकडेवारीमुळे वाद सुरू आहे. ३२ हजार मुली बेपत्ता झाल्याच्या दाव्यावरून अनेकांनी हा भाजपचा प्रोपागंडा असल्याचं म्हटलं आहे. पण महाराष्ट्रातूनही मुली बेपत्ता होण्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

अधिक माहितीनुसार, फक्त मार्च महिन्यात राज्यातून २ हजार दोनशे महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर आकडेवारीनुसार दररोज राज्यातून ७० मुली बेपत्ता होत असल्याची माहिती आहे. बेपत्ता होणाऱ्या मुली या १८ ते २० वयोगटातील असल्याचंही वास्तव समोर आलं आहे.
दरम्यान, जानेवारीमध्ये राज्यातून १ हजार ६०० मुली बेपत्ता झाल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये १ हजार आठशे दहा तर मार्च महिन्यात बेपत्ता झालेल्या मुलींची संख्या ही २ हजार २०० वर पोहोचली आहे. ही बाब खूप धक्कादायक असून यावर तात्काळ तपास सुरू होण्याची गरज असल्याचं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे.
दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. २०२० पासून देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे हरवलेल्या व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी सगळी यंत्रणा कार्यरत असणे आणि त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून आम्ही सतत पाठपुरावा करत असतो पण यावर तात्काळ कारवाई करून राज्याच्या गृह विभागाने तपास सुरू करावा.