मोबाईल रिचार्ज का केला नाही या कारणावरून जन्मदात्या वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला न्यायालयाने सुनावली शिक्षा
खामगाव: मोबाईल रिचार्ज का करून दिले नाही, तसेच पैशांच्या कारणातून मित्रांच्या मदतीने स्वत:च्या वडिलांची क्रुर हत्या करणाऱ्या पुत्रासह तिघांना न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. खामगाव येथील सत्र न्यायाधीश ए.एस.वैरागडे यांनी हा महत्वपूर्ण निकाल शुक्रवारी दिला.
नांदुरा तालुक्यातील खडदगाव येथे २४ मे २०१६ रोजी सोनल विठ्ठल मानकर (२२), गणेश परमेश्वर पेसोडे (२२), वैभव जनार्दन लोणाग्रे या तिघांनी पैशांच्या मागणीसाठी संगनमत करून विठ्ठल निवृत्त मानकर (५५) यांची हत्या केली. याप्रकरणी मृतकाचा भाऊ रामकृष्ण निवृत्ती मानकर यांच्या तक्रारीवरून मध्यरात्री पिंपळगाव राजा पोलीसांनी तिनही आरोपीविरोधात भादंवि कलम ३०२, ५०६, सहकलम ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविला.

तपासादरम्यान तिनही आरोपी जिल्हा कारागृह बुलढाणा येथे असताना कारागृहातून पोलीसांनी सर्व आरोपींना तारीख पेशीकामी जिल्हा व सत्र न्यायाधीशासमोर आणले होते. त्यावेळी आरोपी सोनल विठ्ठल मानकर व गणेश परमेश्वर पेसोडे हे न्यायालयातून पळून गेले होते. खामगाव पोलीसांनी लागलीच पाठलाग करून त्यांना पकडले . त्यानुसार आरोपींवर २२ जून २०१६ रोजी खामगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.