सोलापूर : शहरातील तिघा मित्रांना एकाच दुचाकीवरुन येणे भोवले आहेत. टेंभुर्णीजवळ झालेल्या अपघातात दोन मित्र जागीच ठार झाले तर तिसरा मित्र सोलापुरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या अपघातानंतर भवानी पेठेवर शोककळा पसरली आणि त्या तिघांच्या मित्रांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली.
तेजस सुरेश इंडी (वय २०, रा. मिलन अपार्टमेंट, भवानी पेठ), लिंगराज शिवानंद हाळके (वय २४, रा. भवानी पेठ) हे दोघे जागीच ठार झाले तर तिसरा मित्र गणेश शरणप्पा शेरी हा सोलापुरात उपचार घेत असताना मरण पावला. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी घेतली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार तेजस इंडी, लिंगराज हाळके आणि गणेश शेरी हे तिघे एकस मोटार सायकल (एम. एच. १३/ डी. झेड. ९८२६) वरुन सोलापूरहून पुण्याला निघाले होते. सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ अरण गावच्या हद्दीत वरवडे नाका येथे त्यांच्या दुचाकीला अनोळची वाहनाची धडक बसली. या अपघातात तेजस इंडी आणि लिंगराज हाळके यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा मित्र गणेश शेरी हा गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर प्रथमत: गस्तीवरील महामार्ग पोलिसांनी अपघातातील वाहन बाजूला करुन तिघांना तातडीने टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि तिसरा जखमी गणेश शेरी यास शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.