विटा : विट्याजवळ नेवरी रस्त्यावर गुरुवारी सकाळी खासगी प्रवासी बस आणि मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह चार जण ठार झाले. मुंबईतील मालाडचे काशीद कुटुंब तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे जत्रेसाठी निघाले असताना ही दुर्घटना घडली.
सदानंद काशीद हे मालाड मुंबई येथून आपल्या नातेवाईकांसह मुंबई येथील चालक घेऊन चारचाकी गाडीतून (क्रमांक एम एच 47 केजी 954) गुरुवार 4 मे रोजी मध्यरात्री गावी गव्हाणकडे निघाले होते. तर गीतांजली ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक ए आर ०1 जे 8452) प्रवाशी उतरून विटा येथून नेवरीकडे निघाली होती.

यावेळी नेवरी रस्त्यावर विटा हद्दीत शिवाजी नगरपासून नेवरीकडे थोड्या अंतरावर आल्यानंतर ट्रॅव्हल्स आणि काशीद यांच्या चारचाकी गाडीची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत चारचाकी गाडीतील सदानंद काशीद हे जखमी झाले. त्यांच्या सोबत असणारी त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सूर्यवंशी आणि मालाड येथील बदली चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले. तर सदानंद काशीद हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.