सांगली : कवठेएकंद (ता.तासगाव) येथील जिल्हा बँके च्या शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यात घट आल्याप्रकरणी जिल्हा बँकेने येथील शाखा व्यवस्थापक व शिपाई यांना निलंबित केले. प्राथमिक चौकशीत त्यांच्यावर ठपका ठेवून कारवाई केली असून, या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्राथमिक चौकशीत शाखा व्यवस्थापक सुनील पाटील व शिपाई पोपट पाटील यांच्यावर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले. कवठेएकंद शाखेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट आढळल्याने एका ग्राहकाने याबाबतची तक्रार बँकेकडे केली होती. त्याची दखल घेत मुख्य शाखेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाखा कार्यालयात जाऊन चौकशी केली.
दोन दिवसांच्या चौकशीनंतर त्यांनी याबाबतचा अहवाल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्याकडे सादर केला. वाघ यांनी शाखा व्यवस्थापक व॒ तारण दागिन्यांच्या कामाची जबाबदारी असलेल्या शिपायाला प्रत्यक्ष बोलावून विचारणा केली. त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाघ यांनी दोघांच्याही निलंबनाचे आदेश दिले.
निलंबन काळात या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यात ते पूर्णतः दोषी आढळल्यास त्यांच्यावर प्रसंगी फौजदारी कारवाईसुद्धा होऊ शकते. बँकेचे ग्राहक विश्वासराव माधवराव पाटोल यांनी कवठेएकंद शाखेत सोन्याची अंगठी गहाण ठेवली होती. १२ एप्रिल रोजी त्यांनी दागिना सोडविल्यानंतर त्यात घट झाल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार कवठेएकंद, तासगाव तसेच सांगली शाखेकडे केली.
बँकेचे कर्मचारी, सराफ यांच्या समक्ष दागिन्याच्या वजनाची तपासणी केल्यामुळे ही बाब समोर आली. पाटील यांच्या तक्रारीनंतर परिसरातील अन्य काही ग्राहकांनीही त्यांच्या तारण सोन्यात घट आढळल्याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची गंभीर दखल बँकेने घेतली आहे.