देशात हुंडाबंदी कायदा असतानाही आजमित्तीस नवरा मुलगा किंवा त्याचे कुटुंबीय मुलीच्या कुटुंबीयांकडून हुंडा म्हणून, पैसे, सोनं-नाणं किंवा गाड्यांची अपेक्षा करतात. त्यानुसार, मुलीच्या पित्याकडूनही अनेकदा हा लाड पुरवण्यात येतो. मात्र, एका नवरदेवाला लग्नाअगोदर चारचाकी बोलेरो गाडी पाहिजे असा हट्ट करणे चांगलेच महागात पडले आहे.
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील या घटनेत नवरदेवाला नवरीकडच्या वऱ्हाडी मंडळींनी चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे मुलीकडील मंडळींना नवरदेव आणि त्याच्या काकाला बांधून ठेवले होते. अखेर, पोलिसांनी दोन्हीकडील मंडळींची समजूत घालून प्रकरण शांत केले.

दरम्यान, रात्री ९ वाजता लग्नात फेरे होण्यापूर्वी नवरेदवाने पैशांसह बोलेरो गाडीची मागणी केली. तसेच, या दोन्ही गोष्टी मिळाल्या तरच आपण लग्नास तयार होणार, फेरे घेणार असा हट्टच केला. या अडेलपणाच्या भूमिकेमुळे दोन्ही मंडळींमध्ये बाचाबाची झाली.
त्यावेळी, मुलीच्या नातेवाईकांनी व कुटुंबीयांनी नवरदेव विजेंद्र आणि त्याचे चुलते पप्पूलाल मणी यांची धुलाई केली. कपडेही फाडले. त्यामुळे, दोन्हीकडील लोकं आमने-सामने आले. लग्नमंडपात मोठा गोंधळ निर्माण झाला, मात्र अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवरदेव व नवरदेवाच्या काकांनी धूम ठोकली.
याप्रकरणी विजेंद्रच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांसोबत नवरदेव आणि त्याचे काका पुन्हा मंडपात गेले. त्यावेळी, मुलीच्या मंडळींनी दोघांनाही बांधून ठेवलं होते. अखेर, पोलिसांच्या मध्यस्तीने हा वाद मिटवण्यात आला.