बैलगाडा शर्यतींचा जल्लोष करणारा चित्रपट मोठ्या पडद्यावर अवतरणार ;‘महाराष्ट्र दिनी’ रिंकू राजगुरूने केली घोषणा
महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींना मोठं महत्त्व आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपटात उडताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार आहे. यात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
रिंकू राजगुरुने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘खिल्लार’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये दोन बैल शर्यतीत धावताना दिसत आहे. यावर चित्रपटाचे नाव पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे.

महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना “खिल्लार” शुभेच्छा. भिर्रर्रर्र… महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ … बैलगाडा शर्यत यावर लेखक-दिग्दर्शक मकरंद शशिमधु माने यांनी खिल्लार या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे.