बीड जिल्ह्यातला धनंजय गुंदेकर हा बाजार समितीत संचालक झाला आहे. या विजयानंतर धनंजय यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. विशेष म्हणजे बाजारसमितीचा प्रचार करत असताना एका बाजारात धनंजय आणि त्याचे वडील भाजीपाला विकत बसलेले आहेत. हा फोटो देखील सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. धनंजयचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केले जात आहे. धनंजयच्या अभ्यासू वृत्तीने स्वतःची जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शालेय जीवनापासूनच धनंजय गुंदेकर यांच्यात लोकचळवळीचे गुण होते. उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली, त्यातून बाहेर पडून काही राजकीय व्यक्तींकडे पीए म्हणूनही तो काही काळ राहिला. हे सगळं करताना त्याला त्याच्यातील धडपडणारा कार्यकर्ता स्वस्थ बसू देत नव्हता हेही तितकचं खरं आहे. २०१७ ला आंबेसावळी ग्रामपंचायतीत धनंजयने त्याचे पॅनल उभे केले. त्या दिवसापासून तर त्याने शासकीय अन्यायाने पिचलेल्या जन माणसांसाठी स्वतःला झोकून दिले.

धनंजय गुंदेकर यांच्याकडे असलेल्या लढाऊ बाण्यामुळे सर्व मित्र, सख्या सोबतींची फौज उभी राहिली. आज वयाच्या २८ व्या वर्षी धनंजय बीड बाजार समितीत संचालक म्हणून निवडून गेला आहे. बीड जिल्ह्यातून चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक नवे उमदे नेतृत्व उभे होतेय हे पाहून अनेकांना आनंद झाला.खूप आनंद झाला अशा पद्धतीचा मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.