आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी चुरशीने मतदान सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, रासप यांच्यात कमालीचा संघर्ष होताना दिसत आहे.
मतदान केंद्रावर सकाळ पासून रांगा लागल्या होत्या. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले. तत्पूर्वी 11 वाजण्याच्या सुमारास दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटातील काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांना थप्पड लगावली.
या प्रकारानंतर वातावरण तणावपूर्ण आहे. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, शांततेचे आवाहन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.