माणदेश एक्सप्रेस न्युज : म्हसवड : म्हसवड नगरपरिषद अंतर्गत रहिवाशांना 9 ते 10 दिवसांच्या अंतराने पिण्याचे पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त असून या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेस कडून देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी सातारा यांना पाठवण्यात आले असून त्याची प्रत मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नुकतीच दिली. यावेळी पुणे विभाग किसान काँग्रेस चे उपाध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर, माजी नगरसेवक विकास गोजारी, युवक काँग्रेसचे दाऊद मुल्ला, शिवदास सराटे, दीपक राज महामुनी, विठ्ठल कवडे, अनिल लोखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

म्हसवड नगरपरिषद अंतर्गत पिण्याचे पाणी पुरवठा व्यवस्था अत्यंत ढिसाळ झाली असून प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सध्या शहरात 9 ते 10 दिवसाच्या अंतराने पिण्याचे पाणी येत आहे. तीव्र उन्हाळा, वाढता उष्मा,यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज वाढलेली असून याबाबत नगरपालिका प्रशासन गप्प का? असा संतप्त सवाल तमाम नागरिकांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे.
भविष्याचा विचार करता प्राधिकरणाची नव्याने दुसरी पाईपलाईन महत्त्वाची आहे.मात्र सद्य परिस्थितीत तातडीची उपाययोजना म्हणून उरमोडी कॅनॉलचे पाणी दिवड तलावा मार्गे म्हसवड माणगंगा नदी तील शेंबडे वस्ती बंधाऱ्यात सोडावे. नगरपालिका मालकीच्या शेंबडे वस्ती विहीर व इतर विहिरीतील गाळ काढून पाणीसाठा वाढवावा. सध्या सुरू असणाऱ्या शेंबडे वस्ती पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत पंपाला ग्रामीण ऐवजी म्हसवड शहरा प्रमाणे वीज पुरवठा करावा. अशा मागण्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत.