सांगली/विटा : सांगली व विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. सांगली बाजार समितीसाठी मिरज येथील बाजार समितीच्या शेतकरी भवनमध्ये तर विटा बाजार समितीसाठी मतमोजणी ची सुरुवात विटा येथे झाली आहे. निकाल काय लागणार याची उत्सुकता शिगेला लागलेली असून मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा होत आहेत.
सांगली बाजार समितीसाठी शुक्रवारी ९३.४५ टक्के मतदान झाले. तर विटा बाजार समितीसाठी ९१.३० टक्के मतदान झाले आहे. सांगली बाजार समितीमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती प्रकाश जमदाडे हे भाजप नेते तर महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

विटा बाजार समितीसाठी आमदार अनिल बाबर, माजी नगरसेवक अमोल बाबर, सुहास शिंदे, रविंद्रअण्णा देशमुख, नंदकुमार पाटील, कृष्णदेव शिंदे, गणपतराव भोसले तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार सदाशिव पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सुशांत देवकर, सचिन शिंदे, राजेंद्र माने, किसन जानकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. दुपारी दोन पर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.