माणदेश एक्सप्रेस न्युज I २८ एप्रिल २०२३ । आटपाडी शहरामध्ये आज दुपारी २.३० च्या दरम्यान अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मात्र नागरिकांची भंबेरी उडाली. दरम्यान, हवामान खात्याकडून आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. हवामान खात्यानं आधीच राज्यातील विविध भागात गारपीटसह वादळी पावसाचा इशारा दिला होता. गेल्या दीड महिन्यापासून सांगली जिल्ह्यात अधूनमधून वादळी पाऊस, गारपिटीची मालिका सुरू आहे.

पश्चि्म विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाची स्थिती कायम असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. हवामान खात्याने पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या १७ जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आज शुक्रवारी (२८ एप्रिल) मराठवाडा, विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया. अवकाळी पाऊसासह जोरदार गाटपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.