Latest Marathi News

BREAKING NEWS

जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना

0 521

मुंबईः पीडित मुलगी इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत असून आई आणि चार भावंडांसोबत ती ट्रॉम्बे परिसरात राहते. तिचे वडील परदेशात कामाला आहेत. आरोपी साजिदली हैदर शेख याने १२ एप्रिल रोजी रात्री मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलगी दुकानातून घरी जात असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर मुलीने आरोपीतच्या तावडीतून स्वतःची सुटका केली.

घडलेल्या प्रकारामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. मुलीचे कुटुंब २४ एप्रिल रोजी रात्री जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेले. त्यावेळी मुलगी अस्वस्थ असल्याची शंका तिच्या आईला आली. तिने आणि मुलीच्या मोठ्या बहिणीने पीडितेला विश्वासात घेतले आणि विचारणा केली. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची माहिती घेतली. त्यानंतर पीडित मुलीला आरोपीचे छायाचित्र दाखवले. त्यावरून पीडित मुलीने आरोपीला ओळखले.

Manganga

पोलिसांनी आरोपीला दोस्ती हॉटेलजवळील एका ठिकाणाहून अटक केली. पीडितेनेही त्याच्या छायाचित्रावरून त्याची ओळख पटवली. आरोपीनेही गुन्हा कबूल केला. आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (विनयभंग), ३५४ अ (लैंगिक छळ) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ८ (लैंगिक अत्याचार) आणि १२ (लैंगिक छळ) अंतर्गत अटक करण्यात आली.

यापूर्वी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. तो जामिनावर बाहेर असून त्याने आता अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली आहे. समुपदेशनाद्वारे या धक्क्यातून तिला बाहेर काढण्यासाठी पोलीस मदत करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!