मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. सुट्ट्यांसाठी गावी आलेल्या जवानाचा ऐन लग्न समारंभात मृत्यू झाला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सुट्ट्यांसाठी गावी आलेला जवान नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. लग्न समारंभात जवानाने उत्साहाच्या भरात चक्क तोंडात रॉकेट लावलं आणि दुर्देवाने ते रॉकेट तोंडात फुटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूनंतर गार्ड ऑफ ऑनर देऊन जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या धार जिल्ह्यात राहणारा भारतीय लष्कराचा ३५ वर्षीय जवान निर्भय सिंग सुट्ट्यांसाठी आपल्या गावी आला होता. २४ एप्रिल रोजी अझमेरा पोलीस ठाण्याच्या जलोख्या गावात राहणाऱ्या नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी तो गेला. लग्नसमारंभात विधी सुरू असताना फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली. यावेळी निर्भयने आकाशात जाऊन उडणारे रॉकेट घेतले आणि तोंडातच घरले आणि ते पेटवले, हे रॉकेट तोंडातून वरती आकाशात जाऊन फुटले असे सर्वांना वाटलं पण दुर्देवाने ते निर्भयच्या तोंडातच फुटले.

अनेक लोकांसमोर निर्भयच्या तोंडात ठेवलेल्या फटाक्याचा स्फोट झाला. त्यामुळे निर्भय गंभीर जखमी झाला. घाईघाईत त्याला रुग्णालयात नेले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे या जवानाचे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच अमढेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गुन्हा दाखल करण्यात आला.