अमरावती : बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील ‘घटमांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकीत केले जाते. पण, ही भेंडवळ मांडणी अशास्त्रीय व ‘बोगस’ असल्याची टीका शेतकरी नेते आणि श्रमराज्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी केली आहे.
हे तथाकथित अंदाज कुण्या सर्वसामान्यांने जरी जाहीर केले, तरी त्यातील ५० टक्के अंदाज तसेही आपोआप खरे ठरतील. अनेक ज्योतिषी भविष्य सांगतात. ते जर चुकून खरे झाले, तर त्यावर आपला विश्वास बसतो. पण, या अंदाजाच्या आधारे पेरणी व आपल्या पीकपाण्याचे नियोजन करू नये, असे आवाहन अरविंद नळकांडे यांनी केले आहे.

भेंडवळ येथील ‘घटमांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस आणि इतर घडामोडींचे भाकीत केले जाते. गेल्या ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला ही परंपरा जोपासली जाते, असा दावा बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी करतात. भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे संपूर्ण राज्याचे, खासकरून शेतकऱ्याचे लक्ष लागलेले असते. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.
भेंडवळच्या घटमांडणीत घटामध्ये विविध अठरा धान्ये गोलाकार मांडली ठेवून प्रतीकात्मक मांडणी केली जाते. या प्रथेला वैज्ञानिक आधार नाही. मात्र, शेतकरी यावर मोठा विश्वास ठेऊन आपल्या वर्षभराचे शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसारच करतात. तथापि, पुरेसा पाऊस जमिनीत मुरल्यानंतरच पेरणीसाठी बियाणे खते घेण्यासाठी कृषी केंद्रांवर जावे, त्याआधी घाई करू नये, असा सल्ला अरविंद नळकांडे यांनी दिला आहे. (स्त्रोत : लोकसत्ता)