माणदेश एक्सप्रेस न्युज : जत तालुक्यातील बिळूर येथे भरदिवसा घराचा दरवाजा कटावणीने तोडून पावणे तीन लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. यामध्ये गुरुबसु शिवगोंडा कामगोंड (वय 37) यांच्या घराचा दरवाजा तोडून रोख दोन लाख 43 हजार 500 रुपये व 43 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, असा दोन लाख 84 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी पळवून नेला. रविवारी (दि. 23 एप्रिल) दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान हि घटना घडली. याबाबत जत पोलीस ठाण्यात कामगोंडा यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास फिर्यादी कामगोंड व त्यांचे भाऊ उमेश यांच्यासह घरातील सर्वजण 11 वाजताच्या सुमारास बागेच्या कामाकरिता गेले होते. त्यानंतर दुपारी 1.00 वाजताच्या सुमारास हे सर्वजण बागेतील काम झाल्यानंतर घरी आले. यावेळी लॉक तोडल्याने घराचा दरवाजा उघडा दिसला. खोलीतील साहित्य विस्कटलेले होते. तसेच हॉलमधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. यावेळी रोख रक्कम 2,43,500 रुपये व सोन्याची कर्णफुले, बदाम, अंगठ्या अशी 43 हजार रुपये किंमतीची दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले. यानंतर लगेचच जत पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
