जळगाव : महंगाई कम हुई की नही हुई? डाळीचे भाव कमी झाले की नाहीत? काय झालं अपकी बार की आपटी बार?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशात सध्याची परिस्थिती महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करत उद्धव ठाकरे म्हणाले की, महंगाई कम हुई की नही हुई?, डाळीचे भाव कमी झाले की नाहीत, काय झालं अपकी बार की आपटी बार. सत्यपाल मालिकांमागे सीबीआय लावली. काल परवा तिकडे जवान शहीद झाले मात्र अमित शहा कर्नाटक निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिंदे गटातील नेत्यांवर उद्धव ठाकरेंनी आपली तोफ डागली यावेळी ते म्हणाले की, आमच्याकडे या नाहीतर धाडी टाकतो अशी धमकी दिली जाते. तिकडे गेल्यावर गोमूत्र टाकून शुद्ध करतात. आमच्यामध्ये असताना ते भ्रष्ट कसे असू शकतील. आपल्या भारत मातेमध्ये यांना भाजप शिवाय कोणताच पक्ष ठेवायचा नाही, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे झालेल्या सभेत बोलत होते.