पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 30 एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क परीक्षेचे हॉल तिकीट लीक झाल्याप्रकरणी आता सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास आता नवी मुंबई पोलिस आणि सायबर सेल करणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 30 एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या लिंकमध्ये 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट समोर आल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतरसुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत असल्याने डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 30 2023 रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे 21 एप्रिल 2023 रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसंच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे.