Latest Marathi News

BREAKING NEWS

 

विटा : गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या तरुणास अटक

0 962

विटा : विटा पोलिसांनी गावठी कट्टा (पिस्तुल) आणि दोन जिवंत गोळ्या घेऊन फिरणाऱ्या एका युवकास सापळा रचून पकडले. फर्नांडीस उर्फ अनिकेत नामदेव माने (वय २१, रा.शिवाजी नगर विटा) असे या युवकाचे नाव असून त्याच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल हणमंत लोहार व अक्षय जगदाळे हे विटा शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी विटा ते मायणी रस्त्यावर पवई टेक येथील एका हॉटेलच्या समोरील रस्त्यावर फर्नांडीस उर्फ अनिकेत माने हा त्याच्या कमरेला गावठी कट्टा (पिस्तुल) लावून दहशत माजवत आहे अशी माहीती मिळाली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी जावून शोध घेतला. यावेळी संबंधित हॉटेलच्या समोर एक युवक त्याच्या हातात गावठी कट्टा (पिस्टल) घेवून उभा असलेला सापडला. त्याला ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे गावठी कट्टा (पिस्तुल) व दोन जिवंत राऊंड मिळून आले. त्याच्याकडून ३० हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किंमतीच्या जिवंत दोन गोळ्या असा एकूण ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील हणमंत लोहार, अक्षय जगदाळे, राजेंद्र भिंगारदेवे, सुरेश भोसले, शशिकांत माळी, अमरसिंह सूर्यवंशी, रोहीत पाटील, महेश देशमुख, सागर निकम या कर्मचाऱ्यांनी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.