आटपाडी बाजार समितीसाठी भाजप-राष्ट्रवादी युती तर शिवसेने बरोबर काँग्रेस, रासप आघाडीमुळे निवडणूक चुरशीची
माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २१ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी कृषी उप्तन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. बाजार समितीच्या १८ जागासाठी दुरंगी लढत होत असून आडते व व्यापारी गटामध्ये दोन जागासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. यापूर्वी बाजार समितीमध्ये माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या गटाची एकहाती सत्ता होती. परंतु आता राजेंद्रआण्णा देशमुख यांनी भाजप प्रवेश केला आहे. तर भाजपचे गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे यावेळची निवडणूक ही पडळकर-देशमुख यांच्या गटाकडून संयुक्त लढवली जात असून यामध्ये आता भाजपबरोबर युती करून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात आहे. राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख, वसंत पाटील व वासुदेव लेंगरे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
शिवसेनेकडून जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी बाजार समिती साठी मैदानात उडी घेतली असून त्यांच्यामुळे बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तानाजी पाटील गटाला बाजार समितीमध्ये शिरकाव करू द्यायचा नाही या इराद्याने देशमुख-पडळकर गट मैदानात उतरला असून त्यांनी गावोगावी बैठकांचे सत्र अवलंबले आहे.

आमदार अनिलभाऊ बाबर यांचे खंदे समर्थक म्हणून तानाजी पाटील यांची ओळख आहे. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या माध्यमातून तानाजीराव पाटील यांनी आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना एकहाती किल्ला लढवत तालुक्यातील सर्वात मोठ्या दिघंची ग्रामपंचायतवर सत्ता स्थापन केली करून पडळकर-देशमुख गटाला विचार करायला भाग पाडले आहे. कणखर नेतृत्व, विकास कामे करण्याची धमक, निर्णय घेण्याची क्षमता, कार्यकर्त्यांचे खंबीर पाठबळ या जोरावर ते आटपाडी बाजार समितीवर सत्ता स्थापन करून पडळकर-देशमुख गटाला मात देतात का? हे निकालानंतर समजणार आहे.