सांगली : बुधगाव येथे अंत्यविधीला गेलेल्या एकाचा वीज पडून मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जखमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयकांत रहितराम गोसावी (३२, रा. बुधगाव) असे मृताचे नाव आहे. पिराजी शिवाजी गोसावी (३२, रा. बुधगाव) हा जखमी आहे.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बुधगाव परिसरात वादळी वारे व विजांचा कडकडाट सुरू होता. दरम्यान, बुधगाव येथील मीरा दिलीप गोसावी (५५) यांचे आजारपणामुळे गुरुवारी दुपारी निधन झाले.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास अंत्यविधी प्रक्रिया सुरू असतानाच काही अंतरावर उभे असलेल्या जयकांत गोसावी व त्याचा मित्र पिराजी गोसावी यांच्या जवळ वीज कोसळली. यामध्ये जयकांतचा जागीच मृत्यू झाला, तर पिराजी गंभीर जखमी झाला.