मुंबई : राज्य शिक्षण मंडळवगळता आठवी, नववी आणि दहावीत शिकणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसई इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांचे मराठीचे मूल्यांकन करताना यापुढे श्रेणी स्वरुपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने जाहीर केला.
राज्य सरकारतर्फे १ जून २०२० रोजी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण मंडळांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सक्ती करण्यात आली होती. या निर्णयानुसार सीबीएसई, आयसीएसई, आयबी व अन्य मंडळांच्या सर्व शाळांसाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याची सूचना करण्यात आली होती.

या काळात नियमित शाळा सुरू नसल्याने त्याचा इतर मंडळातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसला. त्यातच इतर परीक्षा मंडळांच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय नवीन असल्याने या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यासंदर्भात तक्रार केली होती.
२०२३-२४ पासून पुढील तीन वर्षांपर्यंत इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मराठी विषयाचे मूल्यांकन करताना श्रेणी स्वरुपात करण्याची सूचना केली आहे.